हर्षल पाटील यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही; थकबाकीविरोधात न्यायालयात जाणार: बीएआय

थकबाकीविरोधात कंत्राटदार उच्च न्यायालयात जाणार
- बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे हर्षल पाटील यांना श्रद्धांजली; मुंबईत आंदोलन छेडण्याचा इशारा
पुणे: जलजीवन मिशनमध्ये १.४० कोटीचे काम करूनही बिले अदा न केल्याने, तसेच या कामासाठी काढलेल्या ६० लाखांच्या कर्जाचे हप्ते भरून न शकल्याने कर्जबाजारी झालेल्या तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना दुर्दैवी आहे. राज्यातील विविध विकासकामांमध्ये गुंतलेल्या कंत्राटदारांची सुमारे ९० हजार कोटी रुपयांची थकबाकी राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. पैसे मिळत नसल्याने कंत्राटदार कंगाल झाले आहेत. शासनाने झालेल्या कामाचे पैसे अदा करावेत, यासाठी दोनवेळा नोटीस पाठवली. मात्र, शासनाकडून त्याला केराची टोपली दाखवली असून, कंत्राटदारांची थकबाकी लवकर अदा करावी, या मागणीसाठी आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (बीएआय) पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. तसेच मुंबईत तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन करण्याचा इशाराही दिला.
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी तांदुळवाडी येथील हर्षल अशोक पाटील यांनी कर्जबाजारी होऊन आपली जीवनयात्रा संपवली. हर्षल पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘बीएआय’च्या वतीने शोकसभेचे आयोजन केले होते. संगम पुलाजवळील ‘बीएआय’च्या सभागृहात आयोजित शोकसभेला बीएआय महाराष्ट्राचे अध्यक्ष जगन्नाथ जाधव, बीएआय पुणेचे अध्यक्ष अजय गुजर, राज्यसचिव मनोज देशमुख, पुणे केंद्राचे उपाध्यक्ष महेश मायदेव व राजाराम हजारे, सचिव सी. एच. रतलानी, खजिनदार महेश राठी, माजी अध्यक्ष सुनील मते, डॉ. राजीव कृष्णानी, पुणे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे रवींद्र भोसले आदी उपस्थित होते. हर्षल पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, दोन मिनिटे शांतता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
जगन्नाथ जाधव म्हणाले, “राज्याच्या विविध विभागातील विकासकामे यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी राज्यभरात हजारो कंत्राटदार आपले आयुष्य पणाला लावतात. काम पूर्ण केल्यावर बिले निघतील, या आशेवर स्वतःजवळची जमापुंजी गुंतवतात. वेळप्रसंगी दागदागिने मोडून, कर्ज काढून ही कामे पूर्ण करतात. मात्र, शासनाकडून काम पूर्ण होऊन वर्षे लोटली, तरी पैसे दिले जात नाहीत. त्यामुळे कंत्राटदार मोठ्या संकटात सापडले आहेत. गेल्या तीनचार वर्षांपासून कंत्राटदारांचे सुमारे ९० हजार कोटी रुपये थकीत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही शासन त्याची दखल घेत नाही. परिणामी, हर्षल पाटील यांच्यासारखे दुर्दैवी पाऊल उचलले जात आहे. यावर आता कंत्राटदार गप्प बसणार नाहीत. हर्षलचे बलिदान वाया जाऊ देणार नाहीत. उच्च न्यायालयाचे दार ठोठावण्यासह आंदोलनाचा मार्गही अवलंबला जाणार आहे.”
अजय गुजर म्हणाले, “हर्षलसारख्या तरुण कंत्राटदाराचे असे अकाली जाणे वेदनादायी आहे. या संवेदनशील विषयातही राज्यकर्ते हर्षल हा सबकॉन्ट्रॅक्टर होता, त्याची सरकारकडे नोंद नाही, अशा संवेदनाहीन प्रतिक्रिया देत आमच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. देशाच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या, शेती क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार निर्माण करणाऱ्या कंत्राटदारांवर ही वेळ येणे दुर्दैवी आहे. आधीची बिले काढली नसताना, सरकार नवीन कामे काढते. निधीची तरतूद केली जात नाही. तरतूद केली, तर ती अन्य योजनांमध्ये वळवली जाते. त्यामुळे पैसे मिळत नाहीत. कंत्राटदारांचे आयुष्य कंगाल होत आहे. ही थकबाकी दिली नाही, तर येणाऱ्या काळात आत्महत्यांचे हे सत्र वाढत जाईल. सरकारने आमचा अंत पाहू नये.”
मनोज देशमुख, डॉ. राजीव कृष्णानी, संजय आपटे यांनीही श्रद्धांजली वाहिली.
