डॉ. स्मिता सुचरिता काशिनाथ जाधव आरोग्य गुरु नारी शक्ति सम्मान पुरस्कार २०२५’ ने सन्मानित**


नालंदा (बिहार) :
७९ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आरोग्य गुरु राष्ट्रीय हिंदी मासिक स्वास्थ्य पत्रिका, नालंदा बिहार यांच्यावतीने दिला जाणारा मानाचा ‘नारी शक्ति सम्मान पुरस्कार २०२५’ पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील स्वरितराज दवाखानाच्या प्रमुख होमिओपॅथी त्वचारोग तज्ज्ञ डॉ. स्मिता सुचरिता काशिनाथ जाधव यांना जाहीर करण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती दिनानिमित्त (१३ ऑगस्ट २०२५) हा पुरस्कार नालंदा (बिहार) येथून पोस्टाद्वारे डॉ. जाधव यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला. त्या प्रत्यक्ष समारंभाला उपस्थित राहू शकल्या नसल्यामुळे मासिकाचे सहसंपादक सौरभ कुमार यांनी पुरस्कार वेळेवर पोहोचवण्यासाठी विशेष सहकार्य केले.
डॉ. स्मिता जाधव यांनी अत्यल्प सेवा शुल्क आकारून रुग्णसेवेत योगदान दिले असून, त्यांच्या होमिओपॅथी उपचार पद्धती व यशस्वी रुग्ण परिणामांचा विचार करून हा सन्मान देण्यात आल्याचे मासिकाच्या वतीने सांगण्यात आले.
यापूर्वीही डॉ. जाधव यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यात नारी सम्मान पुरस्कार २०२३, आरोग्य दूत सन्मान पुरस्कार २०१७/१८, तसेच कोरोना काळातील कोविड योद्धा सन्मान यांचा समावेश आहे.
कोल्हापूर येथील वेणुताई चव्हाण होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या डॉ. जाधव या मूळच्या सांगली जिल्ह्यातील वाटेगाव (ता. वाळवा) गावच्या असून, त्यांनी नसरापूरमध्ये गेल्या वर्षभरापासून स्वरितराज दवाखाना सुरू केला आहे. याआधी त्या कोल्हापूर व वाटेगाव येथे कार्यरत होत्या, तसेच निश कॅन्सर हॉस्पिटल, कोल्हापूर येथे चार वर्षे सेवाभावी कार्य केले आहे.
हा पुरस्कार आपल्या आई-वडिलांना अर्पण करताना डॉ. जाधव म्हणाल्या,
“माझ्या कार्याचा पाया माझे आई-वडील आहेत. त्यांच्या प्रेरणेनेच आज मला हा सन्मान मिळाला आहे.”
त्यांच्या या राष्ट्रीय पातळीवरील सन्मानाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.
