उर्ग्येन आर्ट फेस्टिव्हल – पुण्यात उर्ग्येन संघरक्षित यांच्या शताब्दी वर्षानिमित्त भव्य सांस्कृतिक महोत्सव
📰 पेपरसाठी बातमी

पुणे, १८ ऑगस्ट – त्रिरत्न इन्स्टिट्यूट आणि करुणदीप फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उर्ग्येन आर्ट फेस्टिव्हल हा भव्य सांस्कृतिक सोहळा २१ ते २६ ऑगस्ट २०२५ दरम्यान बालगंधर्व कला दालन, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. त्रिरत्न बौद्ध समुदायाचे संस्थापक व आधुनिक बौद्ध पुनरुज्जीवनाचे अग्रणी उर्ग्येन संघरक्षित (१९२५–२०१८) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा महोत्सव होत आहे.
या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. अस्मिता गायकवाड (मेडिकल डायरेक्टर, फोर्ट्रिया USA) म्हणाल्या की, “‘निर्वाण : ज्ञानप्राप्ती’ या विषयावर आधारित हा महोत्सव कला व धम्माचा संगम घडवणार असून प्रदर्शन, व्याख्याने, ध्यान कार्यशाळा आणि संगीत-नृत्य सादरीकरणांच्या माध्यमातून कला ही आध्यात्मिक जाणिवेचे द्वार कशी ठरू शकते याची मांडणी होणार आहे.”
पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला चंद्रशेखर दैठणकर (माजी आयजी आयपीएस), डॉ. पद्माकर पंडित (मा. अधिष्ठाता, वायसीएम), डॉ. वि. दा. गायकवाड (मा. अधिष्ठाता, कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल पुणे), दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते कला दिग्दर्शक संतोष संखद, ध. तेजदर्शन, सुप्रसिद्ध निवेदक दीपक म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
या महोत्सवात देश-विदेशातील २०० हून अधिक कलावंत व विद्वान सहभागी होणार आहेत.
महोत्सवाचे प्रमुख आकर्षण
- २१ ऑगस्ट : उद्घाटन समारंभ, विद्वत्परिषद, शिल्पकला थेट सादरीकरण व गाणसंध्या
- २२ ऑगस्ट : ध्यान कार्यशाळा, चर्चासत्र, लाईव्ह कॅलिग्राफी व डॉक्टर्स म्युझिकल ईव्हनिंग
- २३ ऑगस्ट : ध्यान कार्यशाळा, चर्चासत्र, चित्रकला व सरोद वादन
- २४ ऑगस्ट : ध्यान कार्यशाळा, पुस्तक प्रकाशन, शिल्पकला व मराठी गझल संध्या (पं. भीमराव पांचाळे)
- २५ ऑगस्ट : ध्यान कार्यशाळा, बौद्ध व कला व्याख्याने, चित्रकला व फ्यूजन म्युझिक कॉन्सर्ट
- २६ ऑगस्ट : जयंती सोहळा, कलाकार सन्मान समारंभ (डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते), तबला सोलो व व्हायोलिन–तबला जुगलबंदी
उर्ग्येन संघरक्षित यांनी बौद्ध धर्माच्या आधुनिक पुनरुज्जीवनात मोलाचे योगदान दिले असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध चळवळीला त्यांनी बळ दिले. त्यांच्या विचारांचा व कलाकृतींचा वारसा या महोत्सवातून अनुभवता येणार आहे.
