October 23, 2025

वास्तू विशारद यांनी सर्व समावेशक विकास प्रकल्प सादर करावे – राजीव भावसार

एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन मध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

पिंपरी, पुणे (दि. २२ ऑगस्ट २०२५) जलदिंडी च्या माध्यमातून पवना नदीचा उगम शोधताना लक्षात आले की, या नदीत शहरी भागात सांडपाणी सोडले गेल्याने ती प्रदूषित झाली आहे. तसेच वाढत्या शहरीकरणामुळे नदी प्रदूषणासारख्या अनेक समस्यांमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आता वास्तू विशारद यांनी सर्व बाजूंनी विचार करून, सर्व समावेशक विकास प्रकल्प सादर करावे अशी अपेक्षा जलदिंडी या नदी सुधार क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेचे संचालक राजीव भावसार यांनी व्यक्त केली.

       पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) च्या एस.बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.

       यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्या डॉ. स्मिता सूर्यवंशी, प्राध्यापक, कर्मचारी, यशस्वी विद्यार्थी उपस्थित होते.

      प्रमुख पाहुणे आर्किटेक्ट प्रतिक देशमुख यांनी सांगितले की, कठोर परिश्रम आणि प्रयत्नात सातत्य ठेवले की यश आणि श्रेष्ठतेचा मार्ग सापडतो. शहरी भागात आता परवडणारी पर्यावरण पूरक घरे निर्माण करण्यात येत आहेत. यामध्ये नैसर्गिक संसाधनाचा वापर करून उच्च तंत्रज्ञान युक्त नागरी सेवा, सुविधा प्रकल्प उभारणी साठी वास्तू विशारद यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. 

      यावेळी अंतिम वर्षात प्रथम ऐश्वर्या गराडे, द्वितीय संयुजा पारवे व तृतीय ऐश्वर्या नायर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. नाशिक महानगरपालिका तर्फे झालेल्या स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी कृतिका कदम, इशिका नारखेडे, तन्वी खोचरे, कुणाल कुंभार, निपुण कोसरे, मृणाल जाधव, श्रुतिका वर्णेकर, अदित्री केंकारे, कादंबरी कुंभार आणि मार्गदर्शक आर्किटेक्ट नीलिमा भिडे, श्रेया कानडे, ऋतुजा माने यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पीडीए आर्किटेक्ट फॉर्म तर्फे पुणे येथे झालेल्या एमसीए आंतराष्ट्रीय क्लब हाऊस स्पर्धेत यश मिळवलेले भाग्यश्री चौधरी, वेदांत गरुड, ईशा डुंबरे, हिमांशु वाघ, सिद्धी सावंत, यश नेहरकर, तिशा केला, गणेश मुदावत यांचा आणि मार्गदर्शक आर्किटेक अजय हराळे, रोशनी देशपांडे, दक्षा देशमुख यांचा देखील सत्कार करण्यात आला. आयआयटी कानपूर येथे झालेल्या कार्यशाळेत राष्ट्रीय स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी दिशा प्रधान, आदित्य बरगे या विद्यार्थ्यांचा आणि त्यांचे मार्गदर्शक प्रा. प्राची देशपांडे यांचाही सत्कार करण्यात आला.

     सूत्रसंचालन प्रा. बिजल वखारिया व श्रेयसी शिंदे आणि आभार प्रा. शिल्पा पाटील यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button