October 26, 2025

पीसीसीओईआर येथे पाचव्या एशियाकॉन -२५ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

पिंपरी पुणे (दि. २४ ऑगस्ट २०२५) भारतात ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञानाचा विकास आणि वापर केला जात आहे. समाजोन्नतीसाठी आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञानाचा विकास केल्यामुळे लोक कल्याणकारी व्यवस्था निर्माण करण्यासाठी मदत मिळते. गरजेनुसार तंत्रज्ञान विकसित होत असून यामुळे देश प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे. नव तंत्रज्ञान विकसित भारतासाठी उपयुक्त ठरते आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले.

     पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड रिसर्च (पीसीसीओईआर) आणि आयईईई यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या पाचव्या ‘एशियाकॉन -२५’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावी इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक डॉ. विकास पाटील, आयईईईचे डॉ. शशिकांत पाटील, कॅपजेमिनीचे मोनिश के‌., उद्योजक नरेंद्र लांडगे, पीसीसीओईआरचे संचालक डॉ. हरिश तिवारी, डॉ. राहुल मापारी, डॉ. विजयालक्ष्मी कुंभार आदी उपस्थित होते. यावेळी ‘एशियाकॉन’ स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

     या परिषदेसाठी सोळा देशांमधून आलेल्या दोन हजार २६२ प्रवेशिकां मधून २५६ शोध निबंधांचे सादरीकरण करण्यात आले, असे डॉ. राहुल मापारी यांनी प्रास्ताविकात सांगितले.

     अशाप्रकारच्या परिषदे मधून संशोधकांना विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीची माहिती होते. नवकल्पना, तज्ज्ञांचे मार्गदर्शन,  विचारांची देवाणघेवाण होते. पुढील वाटचालीसाठी योग्य दिशा मिळते. आव्हानांचा सामना करत त्यावर मात करा, असे मार्गदर्शन डॉ. विकास पाटील यांनी केले.

    ‘आयईईई’ने संशोधकांना व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संस्थेचा नावलौकिक खूप मोठा आहे. पीसीईटीच्या सहयोगाने पाच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन केले जात आहे, यांचा आनंद आणि समाधान आहे असे डॉ. शशिकांत पाटील म्हणाले.

     डॉ. हरिश तिवारी यांनी परिषदेच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी विविध विद्याशाखेचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. मैथिली अंधारे यांनी केले. आभार डॉ. संतोष रणदिवे यांनी मानले.

     पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी उपस्थित प्रतिनिधींचे स्वागत करून परिषदेसाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button