डोंगर दर्यातून सुवर्णयात्रा! पोलादपूरच्या लक्ष्मण दळवींनी व्हिलचेअर बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राला दिलं सुवर्णपदक”
*“तुम्ही कुठे आहात, हे महत्त्वाचं नसतं; पण तुम्ही कुठे पोहोचू इच्छिता, हेच खरं महत्त्वाचं असतं.”*
ही ओळ सार्थ ठरवून दाखवली आहे पोलादपूर तालुक्यातील पायाटा (ता. पोलादपूर, जि. रायगड) येथील लक्ष्मण दळवी यांनी. दोन्ही पायांनी अपंग असतानाही, प्रबळ इच्छाशक्ती आणि अथक मेहनतीच्या जोरावर त्यांनी व्हिलचेअर बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्र टीममध्ये स्थान मिळवत सुवर्णपदकाची कमान उंचावली आहे.






नोकरीच्या शोधात पुण्यात आलेले लक्ष्मण दळवी यांना अपंगत्वामुळे योग्य नोकरी मिळाली नाही. शेवटी त्यांनी *स्टोर्क डिलिव्हरी सर्विस* मध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम स्वीकारले. दिवसाचं काम आणि संध्याकाळी कठोर सराव — हाच त्यांचा दिनक्रम झाला. *पुणे रायडर्स क्लब (PRC)* या संस्थेच्या माध्यमातून त्यांना स्पोर्ट्समध्ये योग्य व्यासपीठ मिळालं. दररोज 3-4 तास वरिष्ठ खेळाडूंसोबत प्रॅक्टिस करत त्यांनी महाराष्ट्र व्हिलचेअर बास्केटबॉल टीममध्ये आपली जागा पक्की केली.
गेल्या आठ वर्षांपासून महाराष्ट्र टीम राष्ट्रीय स्पर्धेत विजेती ठरत आहे आणि या वर्षीदेखील लक्ष्मण दळवींच्या सहभागासह महाराष्ट्राने *व्हिलचेअर बास्केटबॉल नॅशनल चॅम्पियनशिप* मध्ये कर्नाटकचा 44/65 अशा फरकाने पराभव करून सुवर्णपदक पटकावले.
बास्केटबॉलसह त्यांनी व्हिलचेअर मॅरेथॉन, व्हिलचेअर क्रिकेट, आणि व्हिलचेअर रग्बी यांसारख्या विविध क्रीडा प्रकारांतून महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आहे. रायगड जिल्ह्यातील ते पहिले *पॅरा स्पोर्ट व्हिलचेअर बास्केटबॉल प्लेअर* म्हणून त्यांनी नवा इतिहास रचला आहे.
लक्ष्मण दळवींनी आपल्या भागातील दिव्यांग युवक-युवतींना प्रेरणादायी संदेश दिला आहे —
*”स्पोर्ट्स हे केवळ खेळ नाही, तर स्वतःची ओळख निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे. प्रत्येकाने पुढे यावं आणि आपली ओळख घडवावी.”*
