ग्रामीण भागातील मुलींना सक्षम बनविण्याचे कार्य कौतुकास्पद

ग्रामीण भागातील मुलींना सक्षम बनविण्याचे कार्य कौतुकास्पद
- लीला पूनावाला यांचे प्रतिपादन; महिला सेवा मंडळ व विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वतीने मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन
पुणे: मुलींना चांगल्या शिक्षणाची संधी मिळाली, तर त्या स्वतःबरोबर समाजाची प्रगती करतात. ग्रामीण भागातून पुण्यात शिकण्यासाठी येणाऱ्या मुलींना निवास-भोजनाची सोय करतानाच त्यांना व्यक्तिमत्व विकासाचे शिक्षण देऊन सक्षम बनवण्याचे कार्य कौतुकास्पद आहे. महिला सेवा मंडळ आणि विद्यार्थी साहाय्यक समितीच्या संयुक्त प्रयत्नांतून सुरु झालेले मुलींचे वसतिगृह अनेकींचे आयुष्य घडवेल,” असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजिका व समाजसेविका पद्मश्री लीला पूनावाला यांनी केले.
महिला सेवा मंडळ आणि विद्यार्थी साहाय्यक समितीच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन पूनावाला यांच्या हस्ते झाले. या वसतिगृहात नव्याने ८० मुलींची व्यवस्था होणार आहे. एरंडवणे येथील महिला सेवा मंडळाच्या प्रांगणात झालेल्या सोहळ्यात मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष व समितीचे कायम विश्वस्त भाऊसाहेब जाधव, तुकाराम गायकवाड, महिला सेवा मंडळाच्या पुष्पा हेगडे, प्रतिभा घोरपडे, राखी शेट्टी, तनुजा पुसाळकर, समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, खजिनदार संजय अमृते, प्रकल्प समन्वयक प्रभाकर पाटील यांच्यासह दोन्ही संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
तुषार रंजनकर म्हणाले, “स्वच्छता, समता, स्वावलंबन या त्रिसूत्रीवर समितीचे कार्य सुरु आहे. समितीची वसतिगृहे परिवर्तनाची केंद्रे आहेत. ग्रामीण भागातील मुलांना घडवणारे हे मॉडेल पुण्यासह बाहेरही विस्तारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दोन चांगल्या संस्था एकत्रित येऊन चांगले काम होतेय, याचा आनंद आहे. संस्कार, मूल्यांचे शिक्षण येथे मिळते. या कार्यरत माजी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग ही अभिमानाची गोष्ट आहे. हे एक देशकार्य असल्याच्या भावनेतून समिती काम करत आहे.”
पुष्पा हेगडे म्हणाल्या, “गरजू विद्यार्थ्यांना पुण्यात शिकताना हातभार लागावा, सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी या दोन्ही संस्था काम करणार आहेत. महिला सेवा मंडळ गेली अनेक वर्षे मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. समितीच्या साथीने या कार्याला आणखी चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाता येईल. मुलींच्या शिक्षणासाठी समर्पित भावनेने कार्यरत असलेल्या लीला पूनावाला यांच्या हस्ते या वसतिगृहाचे उद्घाटन होणे, हा आनंदाचा क्षण आहे.”
प्रभाकर पाटील यांनी हा वसतिगृह प्रकल्प साकारण्याचा प्रवास उलगडला. समितीच्या कार्यकर्त्या सुप्रिया केळवकर यांनी सूत्रसंचालन केले. ऍड. प्रतिभा घोरपडे यांनी आभार मानले.

