तालेरा रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसिस सेंटरचे उद्घाटन


तालेरा रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसिस सेंटरचे उद्घाटन
फियाट कंपनीच्या सीएसआर निधीतून उभारलेली सुविधा; नागरिकांना मोठा दिलासा
पिंपरी, दि. २१ ऑगस्ट २०२५ :
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तालेरा रुग्णालयात फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा. लि. (FIAPL) कंपनीच्या सीएसआर निधीतून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक डायलिसिस सेंटरचे उद्घाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते झाले. या केंद्रामुळे मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना दिलासा मिळणार असून, जवळपासच आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.
या केंद्रासाठी फियाट कंपनीने ८ अत्याधुनिक डायलिसिस मशीन व सुसज्ज बेडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच एमक्युअर कंपनीच्या सीएसआर फंडातून आर.ओ. प्लॅन्ट बसविण्यात आला आहे.
उद्घाटन प्रसंगी महापालिकेचे मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र फिरके, डॉ. संगिता तिरूमणी, डॉ. संजय सोनेकर, डॉ. लक्ष्मीकांत अत्रे, डॉ. अलवी नासिर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, फियाट कंपनीच्या संचिता कुमार व शुभम बडगुजर यांच्यासह महापालिकेचे सीएसआर सल्लागार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
डायलिसिस सेंटरमधील सुविधा:
- अत्याधुनिक डायलिसिस मशीन
- प्रशिक्षित डॉक्टर व तज्ज्ञ तंत्रज्ञ
- प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र व स्वच्छ बेड
- आपत्कालीन वैद्यकीय सुविधा
- निर्जंतुकीकरण व स्वच्छतेची काटेकोर काळजी
- आरामदायी, हवेशीर व सुरक्षित वातावरण
- नियमित आरोग्य तपासणी व मार्गदर्शन
- रुग्णांच्या सोयीसाठी लिफ्टची सुविधा
मान्यवरांचे प्रतिपादन
विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त
“तालेरा व जिजामाता रुग्णालयात सुरू झालेले हे डायलिसिस सेंटर म्हणजे नागरिकांच्या सेवेसाठी उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षित कर्मचारी आणि स्वच्छ वातावरणामुळे रुग्णांना दर्जेदार सेवा मिळेल.”
डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी
“तालेरा, जिजामाता व आकुर्डी रुग्णालयात नव्या डायलिसिस युनिटची भर पडल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. ‘सर्वांसाठी आरोग्य’ या महापालिकेच्या संकल्पनेला हे केंद्र निश्चितच बळकटी देईल.”
