पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय सेवा केंद्रांमध्ये सुरक्षिततेचा संकल्प!अग्नितपासणी, परवानगीपत्र व सुरक्षिततेसाठी प्रशिक्षण वर्ग संपन्न
पिंपरी, दि. २१ ऑगस्ट २०२५ :
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालये आणि वैद्यकीय सेवा केंद्रांमध्ये अग्नितपासणी (फायर ऑडिट), अग्निसुरक्षा प्रमाणपत्र आणि फायर एनओसी प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील चाणक्य सभागृहात विशेष प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. अग्निशमन विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, उप अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे आणि सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी अंजली ढोणे यांनी अग्निसुरक्षा नियम, कायदेशीर तरतुदी व ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण वर्गात फायर एनओसीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी, अर्ज प्रक्रिया, विभागांमधील समन्वय आणि आधी सादर झालेल्या अर्जांवर झालेली चर्चा याबाबत माहिती देण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जागरूकता वाढवून सुरक्षित आणि नियमपालन करणारी रुग्णालये निर्माण करणे हा आहे.
या सत्रात महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व अग्निशमन केंद्रप्रमुख तसेच विविध दवाखाने आणि उपचार केंद्रांतील डॉक्टरांनी सहभाग नोंदवला.
मान्यवरांचे प्रतिपादन
उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
“अग्निसुरक्षा ही आरोग्य केंद्रांची प्राथमिक गरज आहे. फायर एनओसी आणि नियमपालन प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या उपक्रमामुळे आमच्या विभागाचा आणि डॉक्टरांचा समन्वय वाढेल.”
डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी
“सुरक्षा ही रुग्णसेवेची मूलभूत जबाबदारी आहे. अग्निसुरक्षेची योग्य अंमलबजावणी केल्याने केवळ कायदेशीर पूर्तता होत नाही, तर रुग्ण आणि कर्मचाऱ्यांचे संरक्षणही सुनिश्चित होते. हे प्रशिक्षण त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरले आहे.”

