October 26, 2025

राष्ट्रीय अवकाश दिन”निमित्त सायन्स पार्कमध्ये विशेष कार्यक्रम

२३ ऑगस्ट रोजी व्याख्यान, मून वॉक व ‘मेक अँड टेक’ उपक्रम; विज्ञानप्रेमींमध्ये उत्सुकता

पिंपरी, दि. २१ ऑगस्ट २०२५ :
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सायन्स पार्क व तारामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, सायन्स एज्युकेशन ट्रस्ट, इस्रो-एसपीपीयू एसटी आणि आयआयएसईआर पुणे यांच्या सहकार्याने २३ ऑगस्ट रोजी “राष्ट्रीय अवकाश दिन” साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सायन्स पार्क येथे विद्यार्थ्यांसाठी आणि नागरिकांसाठी विविध शैक्षणिक व मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावर्षीच्या राष्ट्रीय अवकाश दिनाची थीम ‘आर्यभट्ट ते गगनयान – प्राचीन ज्ञान ते अनंत शक्यता’ अशी असून, भारताच्या अंतराळ संशोधन प्रवासाचा आणि त्याच्या भविष्यातील संधींचा आढावा घेण्यात येणार आहे.

कार्यक्रमांतर्गत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत आयआयएसईआर पुणे तर्फे विविध सत्रांचे आयोजन होणार आहे. नागरिकांना चंद्रावर चालल्याचा अनुभव मिळावा यासाठी ‘व्हर्च्युअल रिअॅलिटी मून वॉक’ हा आकर्षक उपक्रम ठेवण्यात आला आहे. तसेच ‘मेक अँड टेक’ अंतर्गत सहभागी अवकाशाशी संबंधित मॉडेल्स स्वतः तयार करून घेऊ शकणार आहेत.

तसेच, ज्येष्ठ इस्रो शास्त्रज्ञ ए. के. सिन्हा यांचे “इंडिया इन्टू स्पेस – इस्रो टुवर्ड्स नॅशनल प्रॉस्पेरिटी” या विषयावर व्याख्यान सकाळी ११:३० ते दुपारी १२:३० या वेळेत तारांगण सभागृहात होणार आहे. सिन्हा यांनी इस्रोमध्ये तब्बल ३६ वर्षे कार्य केले असून भारताच्या अंतराळ संशोधनात मोलाचे योगदान दिले आहे.


मान्यवरांचे प्रतिपादन

शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका
“राष्ट्रीय अवकाश दिन तरुण पिढीला विज्ञानाची प्रेरणा देणारा दिवस आहे. सायन्स पार्कमध्ये आयोजित उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची जिज्ञासा वाढेल.”

प्रविण तुपे, संचालक, सायन्स पार्क
“नागरिकांना राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त भारताच्या अंतरिक्ष प्रवासाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. ही ऐतिहासिक वाटचाल अधिक जवळून समजून घेता येईल.”

डॉ. श्रद्धा खांपरिया, मुख्य कार्यकारी अधिकारी, सायन्स पार्क
“‘व्हर्च्युअल मून वॉक’ आणि ‘मेक अँड टेक’ सारख्या उपक्रमांमुळे मुलांना विज्ञान शिकणे अधिक रंजक होईल. तसेच सिन्हा यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देईल.”

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button