कोथरूडमध्ये शाडू मातीची गणेश मूर्ती कार्यशाळा उत्साहात; हर्षाली माथवड यांचा पुढाकार

पुणे: स्वतःच्या हातांनी आपल्या लाडक्या बाप्पाला आकार, रंग देत लहानग्यांनी शाडू मातीच्या सर्वांगसुंदर अशा गणेशमूर्ती साकारल्या. सर्जनशील हातांना संस्काराची जोड देत पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने कोथरूडमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजिली होती.
कोथरूड विधानसभा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षाली दिनेश माथवड यांच्या पुढाकाराने कोथरूडमधील डहाणूकर मैदानात ही कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यशाळेत लहानग्यांसह पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तज्ज्ञांनी प्रात्यक्षिकांसह मुलांना गणेश मूर्ती घडविण्याची कला शिकवली. गणेश मूर्ती बनविण्यासाठी सर्वांना आयोजकांकडून शाडू माती उपलब्ध करून देण्यात आली.
कार्यशाळेतून घरगुती गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश, तसेच पर्यावरणपूरक मूर्ती निर्मितीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहचवण्यात आले. खेळीमेळीचे वातावरण, स्वतःच्या हातांनी मूर्ती घडविण्याचा आनंद आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश या तिन्हींचा सुंदर संगम या उपक्रमात अनुभवायला मिळाला.
“गणेशोत्सव हा आपला सांस्कृतिक आणि सामाजिक सण आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पाचे स्वागत करणे ही आजची गरज आहे. कार्यशाळेमुळे लहानग्यांना सर्जनशीलतेसोबत संस्कारांची शिकवण मिळाली. नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याचे समाधान आहे. पुढेही अशा उपक्रमांतून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करत राहीन,” अशी भावना हर्षाली माथवड यांनी व्यक्त केली.
