वडगाव शेरीच्या सौ. वृषाली विश्वास पांडे यांना आयुष महासन्मान पुरस्कार



पुणे : वडगाव शेरी येथील सुप्रसिद्ध योग नॅचरोपॅथी थेरपीस्ट सौ. वृषाली विश्वास पांडे यांना आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन तर्फे प्रतिष्ठेचा आयुष महासन्मान पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. हा सोहळा रविवार, 14 सप्टेंबर रोजी मुंबईतील रेडिसन हॉटेल येथे दिमाखात पार पडला. देशभरातील नामांकित मान्यवर व शेकडो आयुष डॉक्टर आणि थेरपिस्टांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा अत्यंत उत्साहात साजरा झाला.
या पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुण्यांमध्ये लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडे, युनायटेड नेशन चाईल्ड अँड वुमेन सल्लागार डॉ. एम. गणेश, भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालयाचे अधिकारी, ए.आय.एम.ए. राष्ट्रीय सल्लागार डॉ. प्रणव पांड्या, डॉ. प्रवीण जोशी यांचा समावेश होता. त्याचबरोबर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, व्हाईस चेअरमन डॉ. नितीन राजे पाटील व इतर वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे सौ. वृषाली विश्वास पांडे यांना मिळालेला हा मानाचा पुरस्कार त्यांनी ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीयुत सागर ढोले पाटील यांच्या हस्ते स्वीकारला. त्यामुळे या सोहळ्याला एक वेगळीच शोभा प्राप्त झाली.
सौ. पांडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून योग व नॅचरोपॅथी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. निरोगी जीवनशैलीचा प्रसार, शारीरिक-मानसिक आरोग्य संवर्धन तसेच समाजाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना आरोग्यदायी जीवनाची नवी दिशा दाखवली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा सन्मान मिळाल्यानंतर सर्वत्र त्यांच्या कार्याची दखल घेतली जात असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वडगाव शेरी तसेच पुणे शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. समाजहितासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येकासाठी हा पुरस्कार प्रेरणादायी ठरेल, असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.
