विठ्ठलदर्शन यात्रेला उत्साहात सुरुवात – १२ वर्षांच्या संघर्षानंतर कौसाबाई सरोदे यांची मनोकामना पूर्ण


आषाढी एकादशीनिमित्त चिचोंडी पाटील येथील भाविकांसाठी मोफत विठ्ठलदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले. आष्टी तालुक्यातील धाकली पंढरी नांदूर विठ्ठल (कपारीचा विठोबा) येथे ही यात्रा भाविक भक्तांसाठी कौसाबाई मारुती सरोदे यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे, तब्बल 12 वर्षांच्या न्यायाच्या प्रतीक्षेनंतर चोरीला गेलेली 51 गुंठे जमीन परत मिळाल्यानंतर त्यांनी ही सेवा भाविकांसाठी अर्पण केली.
या यात्रेच्या निमित्ताने दोन मोफत बसची व्यवस्था करण्यात आली होती. या यात्रेचा शुभारंभ सरपंच शरदभाऊ पवार, कौसाबाई सरोदे, ग्रामपदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रमुखांच्या हस्ते भक्तिभावाने करण्यात आला.
सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल १५०० हून अधिक विठ्ठल भक्तांनी या सेवेचा लाभ घेतला. सरोदे परिवाराच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.या वेळी सरपंच शरदभाऊ पवार यांनी कौसाबाई सरोदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या संघर्षाची दखल घेतली. तसेच हरीओम मित्र परिवारातील स्वयंसेवकांचे आभार मानले आणि सर्व ग्रामस्थांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.
